शीतलहरी म्हणजे काय?
एखाद्या स्थानाच्या वास्तविक किमान तापमानाला आधारभूत मानून शीत लहर असल्याचे ठरविले जाते. जेव्हा मैदानी भागात स्टेशनचे किमान तापमान १०°C किंवा त्याहून कमी आणि डोंगराळ प्रदेशांसाठी 0°C किंवा त्यापेक्षा कमी असते तेव्हा तेथे शीतलहर आहे असे मानली जाते.
1) निर्गमनावर आधारित
- i) शीत लहरी (CW): सामान्य तापमानापेक्षा तापमान ४.५°C ते ६.४°C ने कमी होणे.
- ii) तीव्र शीत लहरी (SCW): सामान्य तापमानापेक्षा तापमान ६.४°C पेक्षा जास्त ने कमी होणे.
2) वास्तविक किमान तापमानावर आधारित (फक्त साध्या स्थानकांसाठी)
- i) शीतलहरी: जेव्हा किमान तापमान ≤ ०४°C असते
- ii) तीव्र शीतलहरी: जेव्हा किमान तापमान ≤ ०२°C असते
सर्वसाधारणतः शीत लहरींच्या प्रभावादरम्यान-
- हिवाळ्यात घालण्यासाठीचे, अंथरूण आणि पांघरण्याचे उबदार कपडे व चादरी स्वच्छ धुतलेले व सूर्यप्रकाशात सुकवलेले असावे.
- शक्य असल्यास घरामध्येच रहा आणि शीत लहरींच्या संपर्कात येण्यापासून रोखण्यासाठी कमीतकमी प्रवास करा.
- शरीर कोरडे ठेवा. ओले असल्यास, शरीरातील उष्णता कमी होऊ नये म्हणून तात्काळ कपडे बदला.
- हाताची बोटे वेगळे असणाऱ्या हातमोजेपेक्षा अखंड असणारे हातमोजे (मिटन्स) घाला जे थंडीपासून बचाव करत अधिक उष्णता टिकवून ठेवतात.
- हवामानाच्या योग्य आणि तात्काळ माहिती व बातम्यांसाठी साठी रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा. शीत लहरींदरम्यान, वर्तमानपत्र, टीव्ही चॅनेल आणि स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या अलर्ट आणि सूचनांकडे कडे बारकाईने लक्ष द्या.
- नियमितपणे गरम पेय प्या.
- वृद्धांची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्या.
- पाण्याच्या गोठण बिंदूच्या खाली तापमान गेल्यास पाण्याचे पाईप्स गोठू शकतात म्हणून पुरेसे पाणी साठवून ठेवा.
- कमी तापमानामुळे होणाऱ्या हिमबाधेची लक्षणे जसे कि बधीरपणा, पांढरी किंवा फिकट पडलेली हातापायाची बोटे, कानाचे लोब आणि नाकाचे टोक यावर लक्ष ठेवा.
- थंडीने (फ्रॉस्टबाइट) बाधित झालेल्या शरीराचा भाग अगदी गरम पाण्यात न ठेवता सहन होईल अश्या कोमट पाण्यात ठेवावे.
- अन्न, पाणी आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा साठा करून ठेवा.
- फुफ्फुसांचे संरक्षण करण्यासाठी तोंड झाकून ठेवा.
शीत लहरींशी संबंधित आजार, लक्षणे आणि प्रथमोपचार पद्धती
- हायपोथर्मिया
हायपोथर्मिया म्हणजे काय?
शरीराच्या तापमानात धोकादायक पातळीवर अचानक घसरण होणे म्हणजे हायपोथर्मिया होय. सामान्यतः थंड तापमानाच्या सतत जास्त संपर्कात आल्यामुळे हायपोथर्मिया होतो (सामान्यतः 34.4 अंश से. (94 अंश फॅ.) पेक्षा कमी झालेले शरीराचे तापमान)
हायपोथर्मिया चे स्तर-
१. सौम्य हायपोथर्मिया- (90 अंश ते 95 अंश फॅ.)
२. मध्यम हायपोथर्मिया- (८२ अंश ते ८९ अंश फॅ.)
३. गंभीर हायपोथर्मिया- (कमी 82 डिग्री फॅ.पेक्षा जास्त)
लक्षणे-
थरथर होणे, चक्कर येणे, तंद्री येणे, चिडचिड होणे, गोंधळणे, अस्पष्ट शब्द उच्चार, धूसर दृष्टी
रुग्ण आढळ्यास काय करावे?
- अशा वेळी तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी रुग्णवाहिकेच्या १०८ या क्रमांकारावर संपर्क करा.
- रुग्णवाहिका येईपर्यंत त्या व्यक्तीला उबदार ठिकाणी घेऊन जा. त्याचे कपडे ओले असल्यास ते तात्काळ बदला.
- सर्व प्रथम त्यांच्या शरीराच्या मध्यभागाला उब द्या. त्यानंतर छाती, मान, डोके आणि मांडीचा सांधा यांना उपलब्ध असल्यास इलेक्ट्रिक ब्लँकेट वापरून उब द्या.
- व्यक्तीचे शरीर उबदार राहण्यासाठी ब्लॅंकेट, कपडे, टॉवेल, चादरी आणि इतर उब निर्माण करणाऱ्या उपकरणांचा वापर करा.
- शरीराचे तापमान वाढवण्यासाठी उबदार पेये द्या. अश्या व्यक्तीला दारू देऊ नका.
- व्यक्ती बेशुद्ध असल्यास तोंडावाटे द्रव देऊ नका.
- अशा व्यक्तीच्या शरीराचे तापमान वाढल्यानंतरही त्यांना डोके आणि मानेसह ब्लँकेट मध्ये गुंडाळून ठेवा.
- व्यक्तीची नस बंद पडल्यास CPR द्या.
- रुग्णवाहिका आल्यावर तात्काळ आरोग्य केंद्रात घेऊन जा.
- हिमबाधा (फ्रॉस्टबाइट)
हिमबाधा (फ्रॉस्टबाइट) म्हणजे काय?
थंडीमुळे शरीराच्या ऊतींचे (Tissues) गोठणे म्हणजे हिमबाधा (फ्रॉस्टबाइट) होय. अनेकदा हायपोथर्मिया सोबतच हिमबाधा होऊ शकते. थंडीमुळे त्वचेच्या पेशींच्या मध्ये बर्फाचा स्पष्टिक तयार होतो आणि पेशींमढील द्रवामुळे त्याचा आकार वाढतो. यामुळे रक्ताभिसरणात अडथळा येऊ शकतो आणि प्रभावित ऊतींचे अतिरिक्त नुकसान होऊ शकते. याचा सामान्यतः गाल, पाय, कान, नाक आणि हातांवर परिणाम होतो.
लक्षणे-
सुरुवातीला त्वचेचा लालसर आणि राखाडीपणा, मुंग्या येणे, मुंग्या आल्यासारखे वाटणे, त्वचा सुन्न होणे, पिवळसर होणे, शरीराचे उघडे भाग थंड, कडक आणि रुक्ष जाणवणे.
रुग्ण आढळ्यास काय करावे?
- शक्य तितक्या लवकर अश्या व्यक्तीला उबदार खोलीत घेऊन जा.
- हिमबाधा झालेल्या पायाने शक्य असल्यास चालू नका यामुळे अधिक नुकसान होऊ शकते.
- हिमबाधा झालेला शरीराचा भाग अगदी गरम पाण्यात न बुडवता कोमट पाण्यात बुडवा. हिमबाधा न झालेल्या व्यक्तीने पाण्याचा गरमपणा तपासून पाहावा. हिमबाधीत व्यक्ती शरीराच्या अवयवांच्या सुन्नतेमुळे पाण्याचा गरमपणा तपासण्यास अक्षम असू शकतो आणि योग्य संवेदना न मिळाल्याने त्वचा जळू शकते.
- शरीरातील उष्णता वापरून जसे कि बगलाची उष्णता हिमबाधीत झालेल्या बोटांना उबदार करण्यासाठी वापरू शकतो.
- हिमबाधा झालेल्या भागाला घासू नका किंवा मालिश करू नका. असे केल्याने अधिक नुकसान होऊ शकते.
- हीटिंग पॅड, उष्णता दिवा, स्टोव्ह, फायरप्लेस किंवा रेडिएटरच्या उष्णतेचा वापरू करू नका. यामुळे हिमबाधीत शरीराचा भाग सहसा सुन्न होऊ शकतो आणि सहजपणे जाळला जाऊ शकतो.
- आवश्यकता भासल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.
- चिलब्लेन्स
चिलब्लेन्स म्हणजे काय?
सततच्या थंड, ओलसर आणि दमट हवामानाच्या (32-60 डिग्री फॅ दरम्यान) प्रभावामुळे काही तासांतच उघड्या त्वचेवर चिलब्लेन्स निर्माण होतात. यामुळे कान, नाक, गाल, बोटे आणि बोटे सर्वात जास्त प्रभावित होतात.
लक्षणे-
सुरुवातीला त्वचा फिकट गुलाबी आणि रंगहीन, वेदना होऊन त्वचेवर काटे येणे, त्वचा सुन्न होणे, त्वचा सुजणे व लाल होणे, खाज सुटणे, गंभीर परिस्थितीत फोड येणे.
आढळ्यास काय करावे?
- चिल्ब्लेन थंडीच्या संपर्कात येणार नाही याची सर्वप्रथम काळजी घ्या.
- झालेल्या चिल्ब्लेनला खाजवू नका.
- चिल्ब्लेनला झालेल्या त्वचेला हळूहळू उब द्या. मालिश करू नका किंवा घासू नका.
- खाज आणि सूज आली असल्यास कॉर्टिकोस्टेरॉइड क्रीम वापरा.
- निर्जंतुकीकरण केलेले आणि कोरडे ड्रेसिंग करा.
- फोड आणि व्रण स्वच्छ आणि झाकून ठेवा.
- आवश्यकता भासल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.
- डिहायड्रेशन
डिहायड्रेशन म्हणजे काय?
प्यायलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा शरीरातून अधिक पाणी बाहेर टाकले जाणे आणि त्यातून शरीराची सामान्य कार्ये मंदावणे किंवा रोखली जाणे या स्थितीला ‘डिहायड्रेशन’ असे म्हणतात. डिहायड्रेशनमुळे थंड हवामानासंबंधित आघात होण्याची शक्यता वाढू शकते.
लक्षणे-
लघवी गडद होणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ आणि अशक्तपणा, तोंड, जीभ, घसा, ओठांचे कोरडे पडणे, भूक न लागणे, चिडचिड, पोटात पेटके किंवा उलट्या होणे, हृदयाचा ठोका वाढणे.
आढळ्यास काय करावे?
- पाणी किंवा इतर उबदार पातळ पदार्थ प्या.
- कॅफिनयुक्त द्रव पदार्थांचे सेवन टाळा.
- बर्फ खाऊ नका.
- पुरेशी विश्रांती घ्या.
- आवश्यकता भासल्यास वैद्यकीय मदत घ्या.
- तळपायांच्या भेगा
तळपायांच्या भेगा का होतात?
थंड पाण्यात किंवा चिखलात दीर्घकाळ पाय बुडवून ठेवल्याने/ राहिल्याने पायांच्या पृष्ठभागावरील ऊती काळसर पडतात आणि पर्यायाने निर्जीव होतात यामुळे पायांना भेगा पडून असह्य वेदना होतात.
लक्षणे-
त्वचा लाल होणे, सुन्न होणे, पायाला सूज किंवा गोळा/पेटके येणे, मुंग्या येणे, फोड किंवा अल्सर, त्वचेच्या अंतर्गत रक्तस्त्राव होणे, गँगरीन (पाय जांभळा, निळा किंवा राखाडी होणे)
काय करावे?
- पायातील बूट आणि ओले मोजे काढून पाय कपड्याने कोरडे करा.
- शक्य असल्यास चालणे टाळा कारण यामुळे पायाच्या ऊतींचे (Tissues) नुकसान होऊ शकते.
- भेगा पडलेल्या भागावर कोमट पॅक लावून किंवा कोमट पाण्यात (102° ते 110° F) अंदाजे 5 मिनिटे ठेवा.
- आवश्यकता भासल्यास वैद्यकीय मदत घ्या.
शीत लहरींसंबंधी विशिष्ठ घटकांसाठी सूचना
- वृद्ध लोकांच्या सुरक्षिततेसाठी–
- वृद्ध लोकांच्या शरीरातील उष्णता झपाट्याने कमी होते. शरीराचे तापमान 35 अंश सेन्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असल्यास त्यांना गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. शीत लहरी जीवघेण्या ठरू शकतात.
- बाहेर थंडीत किंवा थंड घरात राहिल्याने हायपोथर्मिया होऊ शकतो. शीत लहरीं दरम्यान, तापमान कमी होत असल्यास सावध रहा.
- शरीरातील उष्णता कमी होऊ नये यासाठी डोके, मान, हात आणि पाय झाकण्यासाठी उबदार कपड्यांचे सैल थर घाला.
- पहाटे आणि रात्री जेव्हा तापमान खूप कमी होते तेव्हा घराबाहेर पडणे टाळा. बाहेर पडल्यास दव पडत असताना जलरोधक (वॉटरप्रूफ) जॅकेट घाला. कपडे ओले झाल्यास ताबडतोब बदला.
- पौष्टिक आहार घ्या. आपल्याला कुठला आजार असेल तर त्याची औषधे वेळेवर घ्या.
- शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी गरम पेये प्या. दारू पिणे टाळा.
- तुम्ही एकटे राहत असल्यास, शेजारी, कुटुंब आणि मित्र यांच्याशी फोनवर संपर्कात रहा.
- जर तुम्ही बेघर असाल तर रात्री जवळच्या निवारागृहात जा.
- आपत्कालीन परिस्थितीत 108 वर कॉल करा आणि स्थानिक रुग्णवाहिकेशी संपर्क साधा.
- डोंगराळ भागातील स्थानिकांसाठी-
- डोंगराळ भागातील स्थानिकांसाठी शीत लहरींमुळे हायपोथर्मिया, फ्रॉस्टबाइट्स आणि फुफ्फुसांना सूज येणे हे सर्वात मोठे धोके असू शकतात.
- बाहेर जाण्यापूर्वी नेहमी हवामानाचा अंदाज घ्या.
- नजीकच्या परिसरातील वैद्यकीय केंद्रे, धर्मशाळा आणि पंचायत निवारागृहांबद्दल माहिती आणि त्यांचे संपर्क क्रमांक कुटुंबातील सदस्यांना माहित करून द्या.
- वॉटर प्रूफ बॅगमध्ये पुरेसे पाणी, अन्न आणि कपडे ठेवा.
- वृद्ध, लहान मुले आणि आजारी लोकांना थंडीच्या लाटेचा जास्त धोका असतो त्यामुळे त्यांचेकडे विशेष लक्ष द्या.
- घरे उबदार ठेवा.
- ऑक्सिजनची कमतरता आणि श्वास घेतांना अडथळा होणे हे थंडीच्या दिवसांमध्ये जीवघेणे ठरू शकते त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका.
- मोकळ्या/खुल्या वातावरणात काम करणाऱ्यांसाठी-
- शीतलहरींमुळे मोकळ्या वातावरणात काम करणाऱ्या व्यक्ती जसे कि शेतकरी, मासेमार, शेतमजूर, ऊसतोड कामगार, भाजी विक्रेते, रिक्षाचालक, पेपरविक्रेता, मजूर, कामगार, स्वच्छता कर्मचारी, स्थलांतर करणारे पशुपालक, रस्त्यावरील विक्रेते, पोलीस, इ. ना फ्रॉस्टबाइट, हायपोथर्मिया आणि शीत लहरींसंबंधित गंभीर आघात होऊ शकतात. काही वेळा व्यक्ती दगावण्याचीपण शक्यता असते. गरम ठिकाणाहून थंड ठिकाणी स्थलांतरित कामगार यांना देखील धोका असू शकतो.
- काम करताना थंडी पासून आपले संरक्षण करण्यासाठी शरीराचे सर्व उघडे भाग झाकून ठेवा. शरीराची उष्णता राखण्यासाठी उबदार कपडे घाला. ओलेपणा हाताळणीचे काम करत असाल तर शक्यतो जलरोधक कपडा देखील घाला. कपडे ओले झाल्यास ताबडतोब बदला.
- हिवाळ्याच्या दिवसांमध्ये शक्य असल्यास दिवसाच्या सर्वात उष्ण तासांमध्ये काम करा. कामाच्या मध्ये जमेल तेव्हा विश्रांती देखील घ्या.
- कामावरून घरी आल्यावर पुरेशी झोप घ्या. आराम करा. गरम पातळ पदार्थांचे सेवन करा.
- बेघर असणाऱ्या व्यक्तींसाठी-
- बेघर लोकांना पुरेसा निवारा आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी पुरेसे उबदार कपडे आणि ब्लँकेट्स नसल्यास ते शीत लहरींच्या प्रभावाला जास्त असुक्षित असतात. काही वेळा व्यक्ती दगावण्याची ही शक्यता असते. शीत लहरींमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांमध्ये बेघर व्यक्तींचे प्रमाण जास्त असू शकते.
- थंडीच्या दिवसांमध्ये आपल्या संरक्षणासाठी बेघर व्यक्ती सरकारी निवारागृह तसेच इतर मोफत निवासस्थानांमध्ये जाऊन राहू शकतात. विशेषतः सोबत लहान मुले अथवा वृद्ध व्यक्ती असतील तर त्यांना ताबडतोब अशा ठिकाणी पाठवावे.
शीत लहरी आणि पशु सुरक्षा
खालील श्रेणीतील प्राण्यांना शीत लहरींदरम्यान अधिक धोका असतो. त्यांना विशेष लक्ष देण्याची गरज असते.
१. नुकतेच जन्मलेले आणि लहान प्राणी
२. पूर्वी श्वसनाचा आजार झालेले प्राणी
३. स्तनपान देणारे प्राणी
४. कमकुवत आरोग्य असणारे प्राणी
शीत लहरींमुळे प्राण्यांमध्ये होणारे विकार
प्राण्यांमध्ये होणाऱ्या काही शीतलहरिंसंबंधित आजारांमध्ये हायपोथर्मिया, हिमबाधा, भूक न लागणे, जड जनावरांमध्ये संधिवात, पाळीव कुत्र्यांमध्ये खोकला आणि श्वसनाचे आजार, इ, चा समावेश होतो.
विकार | लक्षणे | काय करावे? |
हायपोथर्मिया | शरीराचे तापमान कमी होणे, थरथरणारी सुस्ती, उदासीनता आणि धक्का बसणे | · सकाळच्या अति थंडगार हवामानात गुरे/शेळ्या चरण्यास घेऊन जाऊ नका.
· रात्रीच्या वेळी गुरे/शेळी उघड्यावर ठेवू नका. · पशूंना गरम आणि उबदार ब्लॅंकेट मध्ये गुंडाळा. |
हिमबाधा (फ्रॉस्टबाईट)
|
फिकट कडक त्वचा, त्वचेवर गडदपणासह फोड आणि गँग्रीन होण्याची शक्यता | · सकाळच्या अति थंडगार हवामानात गुरे/शेळ्या चरण्यास घेऊन जाऊ नका.
· रात्रीच्या वेळी गुरे/शेळी उघड्यावर ठेवू नका. · हिमबाधा झालेल्या भागाला कोमट पाण्याने शेकवणे. |
कुत्र्यांना होणारा खोकला
|
श्वासोच्छवास संबंधित संसर्गाची लक्षणे (जसे कि खोकला, शिंका, भरलेले किंवा वाहणारे नाक, घसा खवखवणे, श्वास लागणे, घट्ट छाती किंवा घरघर, इ.) | · लवकरात लवकर लसीकरण आणि पशुवैद्यकीय उपचार करणे. |
शॉक | हृदयाचे अनियमित ठोके, कमकुवत नाडी, शरीराचे तापमान कमी होणे, हिरड्या फिकट होणे | · शरीरातील उष्णता कमी होणार नाही याची काळजी घ्या यासाठी प्राण्यांना ब्लॅंकेटने गुंडाळून ठेवा.
· शक्य तितक्या लवकर पशुवैद्यकीय उपचार सुरु करा. |
पशूंच्या संरक्षणासाठी पशुपालकांना सूचना-
काय करावे?
- पुरेसा चारा, पाणी आणि पशूंसाठी आवश्यक गोष्टी जसे कि औषधे, इ. पुरेश्या प्रमाणात साठवून ठेवा. थंडीपासून गुरांना वाचविण्यासाठी रात्री शेडमध्ये गुरे ठेवा. त्यांना कोरडे अंथरूण द्या.
- आपत्कालीन परिस्थितीत त्वरित संपर्क करण्यासाठी नजीकचे पशु वैद्यकीय केंद्र, खाजगी डॉक्टर आणि औषधांचे दुकान यांचे संपर्क क्रमांक नोंदवून ठेवणे.
- थंडीत गुरे निरोगी राहावी यासाठी गुरांच्या खाद्यामध्ये प्रथिने आणि उपयुक्त खनिजे योग्य प्रमाणात वाढावा.
- जनावरांच्या ऊर्जेची गरज भागविण्यासाठी त्यांना खनिजयुक्त पोषक खाद्य, मीठ, धान्य, गहू आणि गूळ इ. नियमित द्या.
- कुक्कुटपालन करताना पोल्ट्री शेड मध्ये पिल्लांना कृत्रिम प्रकाश देऊन उबदार ठेवा.
काय करू नये?
- सकाळच्या अति थंडगार हवामानात गुरे/शेळ्या चरण्यास घेऊन जाऊ नका.
- रात्रीच्या वेळी गुरे/शेळी उघड्यावर ठेवू नका.
शेतपिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना सूचना-
योग्य उपाययोजना न केल्यास थंडीच्या लाटेचा परिणाम होऊन पिकांचे नुकसान होऊ शकते. थंडीची लाट आणि धुक्यामुळे पिकांवर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. परिणामी बुरशीजन्य रोग, पिकांना आघात आणि काळे रोग होऊ शकतात. IMD आणि प्रशासनाच्या वेळोवेळी मिळणाऱ्या हवामानाची माहिती घेऊन शेतकरी वेळेवर उपायोजना करून पिकाचे संरक्षण करू शकतो.
काय करावे?
- थंडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी पिकांना संध्याकाळी थोड्या प्रमाणात आणि विशिष्ट वेळेच्या अंतराने पाणी द्या.
- नव्याने लावलेल्या तसेच लहान फळझाडांना घासाच्या पेंढ्या, पॉलिथिन शीट, कापड किंवा गोणीने झाकून ठेऊ शकतो.
- केळीचे घड सच्छिद्र पॉलिथिन पिशव्यांनी किंवा कापडाने झाकून ठेऊ शकतो.
- दिवसा पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्यासाठी आणि माती गरम ठेवण्यासाठी शेत तणमुक्त ठेऊ शकतो.
- तांदूळ रोपवाटिकेमध्ये- रात्रीच्या वेळी रोपवाटिकांचे बेड पॉलिथिनच्या शीटने झाकून ठेवा आणि सकाळी काढा. रोपवाटिकांना संध्याकाळी पाणी द्यावे आणि सकाळी पाणी काढून टाका.
- मोहरी, राजमा आणि हरभरा या संवेदनशील पिकांचे दवाच्या आघातांपासून संरक्षण करण्यासाठी सल्फ्यूरिक ऍसिड @ 0.1% (1 लिटर H2SO4 मध्ये 1000 लिटर पाणी) किंवा थायोरिया @ 500 पीपीएम (500 ग्रॅम थायोरिया 1000 लिटरमध्ये पाणी) ने पातळ फवारणी करू शकतो.
- जर आपली शेती थंडीची लाट प्रवण भागात येत असेल म्हणजेच त्या भागात सातत्याने थंडीची लाट येत असेल तर मुख्य पिकासोबतच ठराविक अंतरावर आळी पिकांची लागवड करू शकतो.
- फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला शीत लहरींमुळे खराब झालेल्या झाडांच्या प्रभावित भागांची लवकरात लवकर छाटणी करा. छाटणी केलेल्या झाडांवर तांबे बुरशीनाशकाची फवारणी करा आणि सिंचनासोबत एनपीके देऊ शकतो.
- अधिक माहितीसाठी Kisan Call Center (टोल फ्री क्रमांक १८००-१८०-१५५१) ला कॉल करा.
काय करू नये?
- थंड हवामानात वनस्पतींना मातीत पोषक तत्वे टाकणे टाळा. मुळांच्या मंद क्रियाशीलतेमुळे वनस्पती पोषण तत्वे योग्य प्रमाणात शोषून घेऊ शकत नाही.
- मातीच्या पृष्ठभागात बदल करू नका. पृष्ठभाग सैल असल्यास त्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागाखालील भागात उष्णतेचे वहन कमी होऊ शकते.