सर्पदंश/साप चावणे- सामान्य खबरदारी
सर्पदंशाबाबत माहिती:
• साप चावणे ही वैद्यकीय आपत्कालीन स्थिती आहे. वेळेवर उपचार न झाल्यास ते प्राणघातक ठरू शकते.
• सर्व साप विषारी नसतात. अनेक साप शेतीतील किड नियंत्रित करण्यात मदत करतात.
• सापांना मारण्याऐवजी त्यांचे सुरक्षित रेस्क्यू करण्याच्या पद्धतींना प्रोत्साहन द्यायला हवे.
• बहुतांश सर्पदंश रात्री, शेतकाम करताना किंवा पावसाळ्यात होतात, त्यामुळे अश्या वेळी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
• साप प्रामुख्याने शेतात, लाकडाच्या ढिगाऱ्यांत, जोत्यांमध्ये, दगडाखाली, व पाणवठ्याजवळ लपतात. त्यामुळे अशा ठिकाणी काम करताना सावधगिरी बाळगावी.
सर्पदंश टाळण्यासाठी खबरदारी:
• शेतात काम करताना बूट व जाड कपडे घालावेत.
• रात्री चालताना प्रकाशासाठी टॉर्चचा वापर करावा.
• घराजवळील गवती झुडपे व जास्त वाढलेली गवत वेळोवेळी कापावी.
• झोपायची जागा जमिनीपासून थोडी उंच ठेवावी व मच्छरदाणीचा वापर करावा.
• लाकूड व इतर कचरा घरापासून दूर साठवावा.
• कुटुंबातील सदस्यांना सर्पदंशानंतर काय करावे आणि काय करू नये हे शिकवावे.
• सर्पदंशाबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृती करावी.
• सर्पदंशावरील औषध उपलब्ध असणारे आपल्या परिसरातील जवळचे वैद्यकीय केंद्र आणि तेथील संपर्क क्रमांक याबाबत माहित करून घ्या.
• जवळच्या रुग्णालयाचे, अँब्युलन्स चालकाचे आणि सर्प मित्रांचे मोबाईल क्रमांक सेव्ह करून ठेवा.
सर्पदंश झाल्यास करावयाच्या गोष्टी (DOs):
• शांत राहा. रुग्णाला धीर द्या व हालचाल टाळा. हालचालीमुळे विष लवकर शरीरात पसरते.
• आपत्कालीन क्रमांकावर मदतीसाठी फोन करा. त्वरित वैद्यकीय मदत मिळवा. सर्पदंश ही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आहे.
• दंश झालेला भाग स्थिर ठेवा. चावलेला भाग हृदयाच्या पातळीखाली ठेवा व शक्यतो हलवू नका.
• घट्ट वस्त्र/दागिने काढा: सूज येऊ शकते, म्हणून अंगावरचे दागिने किंवा घट्ट कपडे काढा.
• सापाचे वर्णन लक्षात ठेवा. शक्य असल्यास, सापाचा रंग, आकार व रचना लक्षात ठेवा. हि माहिती सर्पमित्र आणि डॉक्टरांना उपयुक्त ठरते.
• दंशाचा भाग स्वच्छ करा. स्वच्छ पाण्याने हळुवार धुवा. साबण किंवा अँटीसेप्टिक वापरू नका.
• सैल पट्टी बांधून भाग स्थिर ठेवा.
• सर्पदंश झालेल्या व्यक्तीसोबत राहून तिला धीर द्या. दंश झालेल्या व्यक्तीच्या श्वासोच्छ्वास व नाडीवर लक्ष ठेवा.
सर्पदंश झाल्यास करू नयेत अशा गोष्टी (DON’Ts):
• घाबरू नका व सर्पदंश झालेल्या व्यक्तीला पळू देऊ नका. धावल्याने विष लवकर पसरते.
• सर्पदंश झालेल्या ठिकाणी घट्ट पट्टी किंवा दाब देऊ नका. यामुळे रक्तप्रवाह बंद होतो व पेशींचे नुकसान होते.
• जखम कापू नका किंवा विष शोषण्याचा प्रयत्न करू नका. या गोष्टी निष्फळ व धोकादायक आहेत.
• बर्फ वापरू नका. त्यामुळे ऊतींचे नुकसान अधिक होते.
• दारू, कॉफी किंवा औषधे देऊ नका. यामुळे उपचारात अडथळा येतो.
• रुग्णालयात नेण्यात विलंब करू नका. लक्षणे सौम्य असली तरी तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.
• सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका. हे अत्यंत धोकादायक आहे.
• जादूटोणा किंवा घरगुती उपायांवर विश्वास ठेवू नका. मंत्र, घरगुती उपाय यामुळे वेळ वाया जातो. त्वरित रुग्णालयात पोहोचवा.