आपत्तीमध्ये कुटुंबातील सदस्य अडकले असल्यास काय करावे?
• जर वादळामुळे किंवा पूर आल्यामुळे रस्ते बंद झाले असतील तसेच शाळेतील मुले किंवा कामावर गेलेले सदस्य एखाद्या आपत्तीत अडकून घरी परतू शकत नसतील, किंवा त्यांच्याशी संपर्क तुटला असेल, तर घाबरू नका. आपत्ती व्यवस्थापन हेल्पलाईन 1077 किंवा 112 वर कॉल करा किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.
• आपत्तीग्रस्त क्षेत्रात अनेक धोके असू शकतात. सावध राहा व काळजीपूर्वक फिरा.
• जर तुम्हाला घर सोडावे लागले आणि तुम्ही तुमच्या ठरलेल्या सुरक्षित स्थळी पोहोचू शकला नाही, तर कुटुंबासाठी तात्पुरत्या स्वरूपाचे सुरक्षित ठिकाण शोधा.
• जर तुम्ही घरात अडकले असाल व सुरक्षित ठिकाणी जाऊ शकत नसाल, तर अन्न, पाणी व आवश्यक वस्तूंचा काटकसरीने वापर करा.
• प्रौढांचे आहाराचे प्रमाण गरजेपुरते ठेवा पण लहान मुले, वृद्ध व गर्भवती स्त्रियांना शक्य असल्यास नियमित आहार द्या.
• आपत्तीमुळे घरात नुकसान झाले असेल तर तुटलेली काच, सांडलेले ज्वलनशील पदार्थ किंवा रसायने तात्काळ साफ करा.
• विमा कंपनीच्या आपत्कालीन हेल्पलाईनवर शक्य तितक्या लवकर संपर्क साधा. पुढील कार्यवाहीसाठी सल्ला मिळवा.
• तात्काळ दुरुस्त्या आवश्यक असतील तर त्या त्वरित करा आणि पावत्यांची नोंद ठेवा.
• विमा दाव्यासाठी नुकसानग्रस्त भागाचे फोटो/व्हिडीओ काढा. विमा कंपनीशी झालेल्या सर्व पत्रव्यवहाराची नोंद ठेवा.
• कुटुंबातील सदस्यांना सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहित करा. सर्वजण एकत्र राहून सहकार्य करा.
आपत्ती/आपत्कालीन परिस्थितींसाठी पूर्वतयारी कशी करावी?
• आपल्या भागात कोणत्या प्रकारच्या आपत्ती येऊ शकतात हे जाणून घ्या.
• प्रत्येक प्रकारच्या आपत्तीची तयारी कशी करावी हे शिका. आपत्तीची सूचना कशी मिळेल हे देखील जाणून घ्या.
• आपल्या गावात/परिसरात आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित असू शकतील अश्या ठिकाणांची माहिती ठेवा.
• आपल्या परिसरातील मुख्य आपत्ती लक्षात घेऊन घरगुती आपत्कालीन योजनेची आखणी करा.
• कुटुंबीय व शेजाऱ्यांबरोबर आग, वादळ, भूकंप व इतर आपत्तींच्या धोक्यांवर चर्चा करा.
• प्रत्येक आपत्तीप्रकारासाठी घरात व आजूबाजूला कोणती सुरक्षित स्थळे आहेत हे ठरवा.
• आपत्कालीन परिस्थितीत पाणी, वीज व गॅसचे मुख्य नळ/स्विच बंद कसे करायचे हे सर्व कुटुंबीयांना शिकवा.
• आपत्कालीन टेलिफोन क्रमांक सहज उपलब्ध ठेवा व ते सर्व कुटुंबीयांना पाठ असावेत.
• मुलांना पोलीस (100), अग्निशमन दल (101), अँब्युलन्स (102), राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक (112) याबद्दल माहिती द्या आणि ते कधी व कसे कॉल करायचे हे शिकवा.
• हवामान व आपत्कालीन माहिती मिळवण्यासाठी विश्वासार्ह सोशल मीडिया, अॅप्स, टीव्ही-रेडिओ स्टेशन यांचा वापर करा.
• कुटुंबासाठी आपत्कालीन संपर्क योजना तयार करा. आपत्तीदरम्यान कुटुंबातील सदस्य एकमेकांपासून वेगळे होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वांनी एक ठिकाणी येण्यासाठी आधीच नियोजन करून ठेवा.
• आपत्कालीन परिस्थितीत घरातून सहज आणि सुरक्षित बाहेर येण्यासाठी आधीच उपायोजना करून ठेवा.
• दोन आपत्कालीन भेटण्याची ठिकाणे आधीच निश्चित करा व स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेली सुरक्षित निवाऱ्याची ठिकाणे माहित ठेवा.
• आपल्या परिसरात ज्या आपत्ती होण्याची शक्यता आहे, त्यासाठीच्या DOs आणि DON’Ts शिका.
• प्राथमिक उपचार, CPR व आपत्कालीन प्रतिसाद यांचे मूलभूत प्रशिक्षण घ्या.
पाणी शुद्धीकरण (Purifying Water)
• जर पाण्याला वास येत असेल, रंग किंवा चव बदलली असेल किंवा पाण्यात कण दिसत असतील, तर त्वरित स्थानिक पाणीपुरवठा विभागास कळवा. असे पाणी वापरू नये.
• मुख्य पाणीपुरवठा दूषित झाल्यास व पाणी कमी झाल्यास पाणी शुद्ध करूनच वापरावे.
• पाण्यात कण असल्यास ते पेपर टॉवेलमधून गाळा, उकळा, पाण्याचे टॅब्लेट्स टाका किंवा निर्जंतुक करा.
• पाणी शुद्ध करण्यासाठी सामान्यतः पाणी उकळणे आणि क्लोरीन टॅब्लेट्स वापरल्या जातात. परंतु अतिशय गंभीर आणि धोकादायक प्रमाणावर जल प्रदूषण आढळून आल्यास आधुनिक जलशुद्धीकरण यंत्रांचा वापर करावा.
• तज्ञांचा सल्ला घेऊन घरगुती ब्लीचचा वापर निर्जंतुकीकरणासाठी करता येतो, मात्र अति प्रमाणत ब्लीचचा वापर धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे काळजीपूर्वक वापरा.
आपत्तीची पूर्वसूचना मिळाल्यावर काय करावे?
• आपली औषधे, नाशवंत अन्नधान्य व पाण्यासह आपत्कालीन साहित्य जमा करा.
• प्रत्येक व्यक्तीसाठी व पाळीव प्राण्यासाठी दररोज किमान ५ लिटर पाण्याचा साठा ठेवा.
• किमान ३ दिवस पुरेल इतके अन्न व पाणी साठवून ठेवा. खराब हवामानामुळे पाणी/वीज सेवा खंडित होऊ शकते.
• ज्यांना कमी शिजवावे लागते किंवा फ्रीज/पाणी लागणार नाही अशा अन्नपदार्थांचा साठा करून ठेवा. खूप तिखट किंवा खारट अन्न खाणे टाळा.
• लहान मुले व कुटुंबातील इतर सदस्यांना काही अत्यावश्यक आहार लागत असेल तर त्याची आधीच तयारी करून ठेवा.
• मोबाईल फोन चार्ज करून ठेवा. आपत्कालीन संपर्कासाठी SMS वापरा.
• महत्वाचे कागदपत्रे (आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, आरोग्य/लसीकरण नोंदी इ.) गोळा करा व ओले होणार नाही असे सुरक्षित पिशवी अथवा पाकिटात ठेवा.
आपत्कालीन बॅग/किटमध्ये समाविष्ट मूलभूत वस्तू:
• पिण्याचे हवाबंद व सुरक्षित पाणी
• कोरडे व टिकाऊ अन्न (उदा. बिस्किट्स)
• बॅटरीवर चालणारा टॉर्च व अतिरिक्त बॅटऱ्या
• मेणबत्त्या व काडेपेटी/लाईटर (जलरोधक डबीत)
• वैद्यकीय प्रथमोपचार साहित्य, गरजेची औषधे, फेस मास्क, सॅनिटायझर
• डॉक्टरांनी दिलेली आवश्यक औषधांच्या पावत्या
• क्लोरीन टॅब्लेट्स (पाणी शुद्धीकरणासाठी)
• चाकू, कात्री, शिट्टी, डक्ट टेप, कागद व पेन, बॅटरीवर चालणारे रेडिओ
• मोबाईल फोन, चार्जर, पॉवर बँक
• प्राथमिक उपचार पुस्तिका/छायांकित प्रती
• आपत्कालीन योजना, स्थानिक नकाशा, संपर्क क्रमांक, कुटुंबीयांची माहिती
• महत्वाची कागदपत्रे, अतिरिक्त रोख पैसे/मूल्यवान वस्तू
• वाहनाची व घराची अतिरिक्त चावी
• चष्मा/इतर वैयक्तिक सहाय्यक वस्तू
• साबण, सॅनिटरी नॅपकिन्स, वाईप्स, टॉयलेट पेपर, पेपर टॉवेल्स
• जाड दोर व दोऱ्या
• हवामानानुसार कोरडे कपडे, अंतर्वस्त्र, ब्लँकेट्स
• सुरक्षित, टिकाऊ पादत्राणे
• आपल्या भागातल्या संभाव्य आपत्तींनुसार इतर गरजेच्या वस्तू समाविष्ट करा.