वीज कोसळणे- सामान्य खबरदारी
वीज कोसळणे म्हणजे काय?
वीज म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात असणारा प्रचंड भाराचा विद्युत प्रवाह होय. वादळी ढगांमध्ये असणाऱ्या बर्फाच्या कणांवर वर जाणारी हवा आणि खाली जाणारे गुरुत्वाकर्षण यांचा परिणाम होऊन ढगांच्या वर आणि खालच्या थरात धनभर आणि आणि ऋणभार तयार होतो. या भिन्न भारामुळे मोठ्या प्रमाणावर विद्युत उत्सर्जन निर्माण होऊन काही वेळाने हवेतील विद्युत प्रतिकार क्षमता खंडित होऊन वीज चमकतात.
विजेचे उत्सर्जन वातावरणात मुख्यतः तीन प्रकारे होते-
१. एकाच वादळी ढगाअंतर्गत
२. एका वादळी ढगातून दुसऱ्या वादळी ढगात
३. वादळी ढगातून जमिनीत
तिसऱ्या प्रकारात म्हणजे जेव्हा विद्युत विसर्जन वादळी ढगातून जमिनीकडे होते, तेव्हा त्याला वीज पडणे/कोसळणे असे म्हटले जाते.
वीज कोसळल्यामुळे होणारे नुकसान–
- वीज पडल्याने जीवितहानी, पशुहानी, मालमत्ता तसेच पायाभूत सुविधांचे नुकसान होऊ शकते. उच्चदाबाची वीज ज्या वेळी उत्सर्जित होते, तेव्हा विद्युत मार्गातील उष्णता एकाएकी वाढत असल्यामुळे विद्युत मार्गातील हवेचा दाबही तीव्रतेने वाढतो व त्यामुळे विद्युत गर्जना निर्माण होते. मोठी वीज गर्जना किंवा अचानक येणारा प्रचंड प्रकाश यामुळे बहिरेपणा किंवा आंधळेपणा येऊ शकतो. अचानक झालेल्या आघातामुळे व्यक्ती गोंधळून जाऊन दीर्घकालीन मानसिक धक्का पोहचू शकतो.
- वीज जमिनीकडे अर्थिंगसाठी आकर्षित होतांना प्रचंड वेगाने वाहते, अशा विजेचे वाहन होत असताना परिसरातील सर्वात उंच वस्तू जर विजेचे वाहक असतील तर त्याकडे वीज आकर्षित होण्याची जास्त शक्यता असते. प्रचंड दाबामुळे उंच इमारतींच्या खिडक्या फुटू शकतात. तसेच विजेचा प्रत्यक्ष आघात इमारत, उंच घर, विजेचे खांब, पायाभूत सुविधा यावर होऊन मोठ्याप्रमाणावर नुकसान होऊ शकते.
- लाकूड, दगडी भिंत यासारख्या वीज वाहक नसणाऱ्या गोष्टी जरी प्रचंड दाबाने येणाऱ्या विजेच्या मार्गात आल्या तरी त्यांचा देखील स्फोट होण्याची शक्यता असते. जंगले, इमारती, रासायनिक व खनिज तेलाचे कारखाने किंवा काही ज्वलनशील पदार्थ प्रचंड दाबाने येणाऱ्या विजेच्या मार्गात आले तर तेथे आग लागण्याची शक्यता असते.
वीज कोसळणे– सामान्य खबरदारी
आपण मोकळ्या जागेत असताना-
• विजेचा प्रकाश आणि आवाज यात जर ३० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी अंतर असेल तर आसपासच्या ५ किलोमीटर च्या अंतरात वीज पडत असण्याची शक्यता असल्याने तुम्हाला विजेपासून अधिक धोका असू शकतो.
• मैदान, शेत सारख्या मोकळ्या जागी आपण असाल आणि आजूबाजूला तुमच्यापेक्षा उंच काहीही नसेल तर ताबडतोब आडोशाला जा.
• रस्त्याच्या बाजूला असणारे एकटेच झाड, खांब, मनोरा (Tower), पत्राचे/ धातूचे बसस्टॉप अथवा टपऱ्या असुरक्षित असू शकतात, त्यामुळे तेथे आसरा घेऊ नका.
• विजेचे सुवाहक असणाऱ्या गोष्टी जसे कि उंच झाडे, विजेचे खांब, जलस्रोत, इ. खाली किंवा जवळ आसरा घेऊ नका.
• आपण डोंगर अथवा टेकडी वर असाल तर लगेच खाली उतरा.
• स्विमिंग पूल, तलाव, समुद्र, इ. यांसारख्या पाण्याच्या कोणत्याही मोठ्या साठ्यापासून शक्य तेवढे लांब जा.
• रबरी बूट व हातमोजे घातल्याने वीज पडण्यापासून आपल्याला कोणतेही संरक्षण मिळत नाही हे लक्षात ठेवा.
• जवळ कुठलीही धातूची वस्तू जसे कि छत्री, विळा, फावडे आणि इतर धातूचे शेतीसाहित्य सोबत बाळगू नये.
• वीज पडतांना वीजप्रवाह जमिनीत जात असल्याने जमिनीसोबत कमीत कमी संपर्क असणे महत्वाचे असल्याने जमिनीवर झोपू नका.
• वीज पडण्याच्या आवाजामुळे बहिरेपणा येऊ शकतो त्यामुळे कान हातांनी झाका.
• सुरक्षित इमारतीत आसरा घ्या.
• वीज पडण्याची शक्यता असताना सुरक्षित जागा मिळत नसेल तर गुढग्यातून वाकून दोन पायावर बसावे आणि मान गुढग्याजवळ वाकवत कानावर आत ठेऊन सावध राहावे. आजूबाजूला काही सुरक्षित जागा नसताना झाडापासून त्याच्या उंचीच्या दुप्पट अंतरावर राहावे.
• विशेषतः- वीज पडून शेतात काम करणाऱ्या लोकांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वादळी परिस्थितीकडे दुर्लक्ष न करता शेतकरी, शेतमजूर, पशुपालक यांनी शेती तसेच खुल्या मैदानात काम करत न राहता तात्काळ सुरक्षित ठिकाणी जावे. वीज पडत असतांना पशुपालकांनी आपल्या गुरांसह झाडाखाली आसरा घेऊ नये.
घरात असताना-
• वादळी वारा आणि विजा चमकत असताना शक्यतो सुरक्षित घरातच राहा.
• फक्त घरात राहिल्याने वीज कोसळण्यापासून सुरक्षित असल्याची खात्री होऊ शकत नाही त्यामुळे इतर आवश्यक गोष्टींची देखील काळजी घ्या.
• घराची बाल्कनी, अंगण आणि छतावर उभे न राहता तात्काळ घरात जा. घराच्या खिडक्या आणि दारे बंद ठेवा.
• घरात खिडक्यांच्या जवळ उभे न राहाता शक्यतो खोलीच्या मध्यभागी रहा. विजेच्या आवाजाने खिडक्यांच्या काचा फुटण्याची शक्यता असते.
• वीज चमकत असताना कोणतेही विद्युत तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे कि मोबाईल, फ्रिज, मिक्सर, AC, टीव्ही, इ. बंद करा. हाताळू नका.
• मोबाईल फोन चार्जिंगला लावू नका. मोबाइल, वायर फोन किंवा कॉर्डलेस फोन वर बोलू नका. आपत्कालीन परिस्थिती साठी मोबाइल फोन ची बॅटरी जपून ठेवा. शक्य असल्यास SMS द्वारे संपर्कात राहा.
• पाण्याची पाइपलाइन मध्ये विद्युत प्रवाह होऊ शकतो त्यामुळे अशा वेळी नळाखाली हात, कपडे, भांडे धुवू नका. शॉवर ने अंघोळ करू नका.
• पाळीव प्राणी बाहेर असल्यास त्यांना देखील आत सुरक्षित ठिकाणी आणा.
• विजेचा शेवटचा गडगडाट ऐकल्यानंतर कमीत कमी ३० मिनिटांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडू शकतो.
गाडीमध्ये असताना-
• आपण जर गाडीमध्ये असाल आणि इतर कुठल्या सुरक्षित ठिकाणी जाणे शक्य नसेल तर काचा आणि इंजिन बंद करून गाडीमध्येच थांबा. गाडीत कोणत्याही धातूला स्पर्श करू नका.
• जर रिक्षा किंवा कापडी छताच्या इतर वाहनात तुम्ही असाल तर त्यातून लगेच बाहेर पडा आणि सुरक्षित इमारतीत आसरा घ्या.
विजेच्या आघातामुळे होणाऱ्या दुखापतीची चिन्हे आणि लक्षणे-
त्वचा जळणे, ऐकू न येणे, डोळ्यांना दिसणे बंद होणे, श्वास घेण्यास अडचण, अनियमित हृदयाचे ठोके, छाती दुखणे, डोके दुखणे, जागे राहण्यात अडचण होणे, गोंधळ होणे, भ्रम वाटणे, चक्कर येणे, स्नायूंचे दुखणे, अशक्तपणा, तात्पुरता अर्धांगवायू, कोसळणे, नाडी मंद हळू होणे किंवा बंद पडणे, हृदयविकाराचा झटका, इ.
उपचार करताना-
• वीज पडल्याने व्यक्ती भाजणे, शारीरिक इजा, बेशुद्ध होणे यासारखे आघात होऊ शकतात. अशा व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय उपचार आवश्यक आहे.
• आवश्यकतेनुसार १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेची संपर्क करा. शक्य असल्यास तात्काळ जवळच्या रुग्णालयात घेऊन जा.
• रुग्णवाहिका येई पर्यंत व्यक्तीला तात्काळ प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न करा.
• विजेचा आघात झालेल्या व्यक्तीवर कोणताही विद्युत भर नसतो त्यामुळे अश्या कोणत्याही रुग्णाला मदत करताना आपल्याला विद्युत धक्का बसेल असा गैरसमज बाळगून घाबरून जाऊ नये.
• वीज पडलेल्या ठिकाणी पुन्हा वीज पडू शकते त्यामुळे विजेने आघात झालेल्या व्यक्तीला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे.
• विजेचा आघात झालेली व्यक्ती जर बेशुद्ध असेल तर त्यांना जमिनीवर झोपवताना डोक्याचा भाग तळपायाच्या बोटांपेक्षा खालील बाजूला/कमी उंचीवर ठेवा.
• जर असा रुग्ण श्वास घेत नसेल परंतु त्याची नाडी जाणवत असेल तर त्याला कृत्रिम श्वासोच्छवास द्या.
• विजेचा आघात झालेली व्यक्ती जर श्वास घेत असेल आणि त्यांची नाडी चालू असेल तर अशा व्यक्तीला भाजणे, बहिरेपणा, आंधळेपणा, हाडमोड अशी काही शारीरिक इजा झाली आहे कि नाही ते तात्काळ तपासून पहा.